“एखादा दिवस त्यांच्यासाठी”

आमच्यासाठी तो वेगळा दिवस असावा, पण त्यांच्यासाठी तो रोज सारखाच रोज होता. १५ ऑगस्टला zophop ने स्वतंत्रदिन मुंबईच्या लोकलबस मधील कनडक्टर्स बरोबर घालवला. ठरल्याप्रमाणे टीम वेळेवर वाशी बसडेपो जवळ हजर होती. सगळे कनडक्टर्स आपापल्या कामात व्यस्त होते. एखादा कनडक्टर येता-जाता आमच्याकडे बघतही होता आणि आम्ही मात्र एका प्रश्नात गुंतलेलो होतो..’सुरुवात कुठनं करावी’?

zophop-bus-conductors-navi-mumbai

“उगाच वेळ घालवण्यात अर्थ नाही.” असा विचार करत आमच्यातला एक पुढे झाला आणि एका कनडक्टरच्या शर्टवर झेंडा लावला. टीममधील काहीजन मराठी होते. त्यामुळे कनडक्टर्स ही हळू-हळू बोलती झाली. आम्ही झेंडा लावत असताना एखादा फार मनातनं हसायचा. एखाद्याला फार हेवा वाटायचा. ज्या लोकांमुळे मुंबई चालू राहते, लाखो लोक बसने प्रवास करतात. अश्या लोकांसाठी आम्ही आमच्या आयुष्यातला एक दिवस भेट दिला. ही गोष्ट त्यांना खूप आवडली.

zophop-bus-conductor-navi-mumbai     काही कनडक्टर्सने एखादे-दोन झेंडे आपल्या कुटुंबीयांकरिता मागून घेतले. “आपली फॅमिली वेगळी दिसायला पाहिजे साहेब, दोन झेंडे मला बी द्या, बायका –पोरांना लावतो.” एखाद्याने आपली व्यथा सांगण्याचा प्रयत्न केला. “इतक्याश्या पगारात कुटुंब चालवणं अवघड जातं, साहेब. बायको म्हणती मुलाला इंग्रजी मेडियम मधेच शिकवायचं. ‘पण इतका पैसा आपल्याकडे नाही’ असं सांगायची लाज वाटते आणि सगळ्या ठिकाणी इच्छा मारत, काटकसर हाच पर्याय राहतो.” वाईट वाटत राहिलं पण काही करू शकत नव्हतो. प्रत्येकाच्या शर्टला झेंडा लावताना वेग-वेगळ्या गोष्टी कळत राहिल्या. २०० झेंड्यांबरोबर तितक्याच कथा आणि व्यथा समोर येत राहिल्या. पाच रुपयांच्या झेंड्याने डोळे उघडण्यास भाग पाडले. एका झेंड्यामुळे आम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकलो, त्यांना समजू शकलो.

“वैष्णव जण तो तेने कहिये जे, पीड परायी जाणे रे” या वाक्यांचा अर्थ समजल्याचा भास झाला. ह्या १५ ऑगस्टला आम्ही त्यांच्या वेदना समजू शकलो, हेच भाग्य वाटते. त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं, ही भावना मनात येणं म्हणजेच; अजूनही या भारतमातेचे संस्कार आपल्या मनात, रक्तात भिनले आहेत याची पावती होती.

आज-कालच्या युगात “आपण समाजाला काहीतरी देणं लागतो” हे वाक्य बोललं, की लोकं हसताना दिसतात. भगत सिंग पेक्षा हानी सिंग जास्त पॉप्युलर वाटतो. भारतचं भविष्य असणारी तरुण पिढी भरकटताना दिसते. पण आपण त्याला काही करू शकत नाही. शेवटी, एसी रूम मध्ये बसलेल्यांना उन्हाच्या चटक्यानं विषयी निबंध लिहायला लावणं म्हणजे मूर्खपणाच ठरतो. जो पर्येंत तरुण पिढी बाहेर निघून, एखाद्याची मदत करण्याचा विचार करत नाही, तो पर्येंत काहीच बदल होऊ शकत नाही. म्हणूनच १५ ऑगस्टला,महागडे कपडे घालून, नटून फक्त मिरवण्या पेक्षा एखादी गोष्ट समाजासाठी करता आली, तर नक्की करा. कदाचित गोष्टी बदलतील.